Tuesday, October 05, 2004

मराठी चित्रपटांना मिळालेला नवा श्वास

गेल्या महिन्यात जेव्हा बातम्यांमध्ये आणि पेपरमध्ये वाचलं की वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिलं जाणारं सुवर्ण कमळ श्वास ह्या मराठी चित्रपटाला मिळालं आहे तेव्हा सहाजिकच खुप सही वाटलं. पण जेव्हा हे वाचलं की हा मान एका मराठी चित्रपटाला तब्बल पन्नास वर्षांनंतर मिळत आहे तेव्हा विचार केला की इतका मोठा उपवास घडण्याइतकीच पत आहे का मराठी चित्रपटसृष्टीची? नक्कीच नाही!!! मी अगदी दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकर, शांताराम बापू ह्या सगळ्या दिग्गजांच्या निर्मितींपर्यंत जात नाही, पण अगदी काल-परवाचे वजीर, कळत-नकळत, चौकट राजा, १०वी फ, रात्र आरंभ, एक होता विदुषक – अशी उत्कृष्ट म्हणता येतील अशा अनेक चित्रपटांची नावं सुचतात. मग ह्या आधी हा बहुमान फक्त एकाच मराठी चित्रपटाला मिळावा - हे कुठेतरी मनाला खटकतंच! सगळा सारासार विचार केला तर मात्र शेवटी हे मान्य केरावं लागतं की वर्षातून एखादा उत्कृष्ट चित्रपट देणा-या मराठी चित्रपटसृष्टीची पातळी जरा खालवली आहे खरी !! आता हेच बघा ना – मणिरत्नमचा युवा (*) कितीही घाटी असला तरी तो निव्वळ उत्सुकतेमुळे बघितला जातो, पण मराठी श्वास कितीही चांगला असला तरी त्याला सुवर्ण कमळ मिळेपर्यंत म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. हे बदलायला नको का?

असो, better late than never!!! श्वासला मिळालेल्या ह्या सन्मानामुळे, किंवा त्याचबरोबर श्वास oscar मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे म्हणून तरी “मराठी” “रसिकांची” ही वृत्ती बदलायला सुरुवात होईल अशी आशा ...

तर सांगायचा मुद्दा असा की अनेक दिवस “house full” चा board बघितल्यानंतर परवा श्वासची तिकीटं मिळाली!!! आपला सख्खा नातू थोड्याच दिवसांत पूर्णपणे आंधळा होणार आहे – हे सत्य एक हताश झालेले आजोबा कसं स्वीकारतात त्याची ही गोष्ट आहे. एका typical “ART” film च्या साच्यात जर हा चित्रपट घडवला असता तर एक अतिशय भडक वास्तव दाखवणारा सिनेमा झाला असता. आणि जर commercially handle केला असता तर बायकांचे रूमाल ओले करणारा पिक्चर झाला असता. पण संदीप सावंतने ज्या सहजतेने श्वासची कथा मांडली आहे त्यामुळे ती वास्तव दाखवता – दाखवता कुठेतरी व्याकुळ करून जाते.

कोकणातल्या एका छोट्या गावात आपल्या कुटुंबाला घेऊन राहणारे (sorry – जगणारे) अतिशय सज्जन आणि भाबडे आबा आपल्या नातवाला (परशा) नीट दिसत नाही म्हणून व्याकुळ होतात आणि त्याला उपचारासाठी पुण्यात घेऊन येतात. Tests केल्यावर स्पष्ट होतं की त्याच्या retinoblastoma (डोळ्यांचा cancer) झाला आहे आणि operation करून त्याचे डोळे काढून टाकण्यावाचून काहीही पर्याय उरत नाही. तुला आता operation नंतर परत काहीही दिसणार नाही हे त्या छोट्याशा जिवाला कसं समजवायचं ह्या चिंतेत सापडलेल्या आबांना doctor आणि medical social worker असावरीची मदत मिळते. Operation ठरतं पण काही अडचणींमुळे एक दिवस पुढे जातं. त्या एका दिवसात आपल्या नातवाची होणारी तडफड आबांना बघवत नाही आणि ते कोणालाही काहीही न सांगता परशाला घेऊन hospital मधुन चक्क पळून जातात. Hospital मध्ये सहाजिकच खूप धांदल उडते. Doctors सकट सगळे प्रचंड संतापतात कारण खूप शोध घेऊन सुद्धा आबा आणि परशा कुठेही सापडत नाहीत! संध्याकाळी जेव्हा ते परत येतात तेव्हा चिडलेले doctor त्यांना “बेजबाबदार” ठरवून खूप काही ऐकवतात. पण जेव्हा ह्या “बेजबाबदार”पणामागची आबांची भूमिका कळते तेव्हा doctorच नव्हे तर चित्रपटगृहातले प्रेक्षक सुध्दा हळहळतात. उद्या ज्या मुलाची दृष्टी कायमची जाणार आहे त्याने आज डोळ्यांत काय साठवून घ्यायचं – hospital मधली औषधं का बाहेर मोकळ्या हवेत उडणारे पक्षी, शेजारचे आजारी patients का बाहेरची हिरवळ. आजवर परशाला न जगता आलेलं आणि कदाचित पुन्हा कधीही जगता न येणारं आयुष्य जर आबांनी त्याला एका दिवसात दाखवण्याचा प्रयत्न केला तर काय चुकलं त्यांचं? इतकं साधं आणि सरळ कथानक आहे श्वासचं. कथा कुठेही loose सुटलेली नाहीये. Through-out प्रेक्षकांना विचार करत ठेवतो – उगाचच भावनिक न करता!!!

काही प्रसंग मनात घर करुन बसतात. उदाहरणार्थ doctor आणि असावरी वर जबाबदारी असते की परशाला समजावणं आणि येणा-या अंधत्वाची कल्पना देणं. ते अंधळी-कोशिंबीर खेळत असताना “तुम्ही मला सारखं - सारखं डोळे बंद करायला का सांगताय, मला माहिती आहे की मी आंधळा होणार आहे” ही परशाची कबुली जराशी predictable असली तरी मनाला लागते. “त्याची तब्यैत ठीक आहे म्हणताय पण तो आज पोटभर जेवला का ते सांगा ना”, अशी काळजी करणारी परशाची आई व्याकुळ करुन जाते.

श्वासची अजून एक लक्षात रहाणारी गोष्ट म्हणजे त्यात चितारलेलं कोकण!!! एकेक frame इतकी सुंदर आहे की तिथं जाऊन तिथंच राहून जावंसं वाटावं.

श्वास लगान इतका high-budget नाहीच, पण त्याच्या निर्मितीचे पैसे गोळा करणंसुध्दा इतकं सोपं नसावं ह्याचा अंदाज निर्मात्यांच्या यादीत संदीप सावंत आणि अरूण नलावडे सोडून इतर एकूण सहा नावं बघून लगेच येतो. आता oscar साठी लगान इतकी प्रसिध्दी करणंही त्यांना शक्य नाही हे अगदी स्पष्ट आहे. पण श्वासचा साधेपणा आणि विषयाची सहज-सोपी मांडणीच त्याची सर्वात जमेची बाजू म्हणता येईल. ह्याच जोरावर एका मराठी चित्रपटाने oscar मध्ये इतिहास घडवावा आणि मराठी चित्रपटविश्वाला नवा श्वास द्यावा हीच मनापासून कामना!!!

श्वास आणि लगानची तुलना करणं कदाचित बरोबर नाही. पण या आधी भारताकडून oscarला गेलेल्या जीन्स आणि देवदास (*) पेक्षा तरी श्वास चांगलाच म्हणावा लागेल. कारण श्वासमध्ये चित्रपटाच्या नायकाच्या बाबतीत जेव्हा काही वाईट घडतं तेव्हा प्रेक्षकांना निदान वाईट तरी वाटतं !!!



(*) Disclaimer – इथे घेतलेल्या काही चित्रपटांची नावं प्रथम सुचली म्हणून वापरली. त्यांबद्दल मांडलेली मतं माझी वैयक्तिक असून इथे कोणालाही दुखवायचा हेतू नव्हे.